• Sun. May 5th, 2024

खरंतर सभागृहातच आमच्यावर अत्याचार होतो… महिला आमदार विधानसभेत स्पष्टच बोलल्या

Byjantaadmin

Dec 30, 2022
“खरंतर सभागृहातच आमच्यावर अत्याचार होतो…” महिला आमदार विधानसभेत स्पष्टच बोलल्याकाँग्रेस आमदार प्रतिभा धानोरकर

नागपूर येथे विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु असून शेवटच्या दोन दिवसांत विरोधी पक्षाकडून मांडलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा होत आहे. विरोधी पक्षातील अनेक आमदार अंतिम आठवडा प्रस्ताव या आयुधाचा वापर करुन आपापली भूमिका मांडत असतात. या प्रस्तावावर बोलण्यासाठी जुन्या, नव्या सर्वच आमदारांना पक्ष प्रतोद यांच्या परवानगीनुसार बोलायची संधी मिळत असते. काल रात्री उशीरापर्यंत विधानसभेत या प्रस्तावावर चर्चा सुरु होती. काँग्रेसच्या महिला आमदार प्रतिभा धानोरकर यांच्या भाषणावेळी त्यांनी सभागृहातच महिलांवर अत्याचार होत आहे, अशी टीका केली.

प्रतिभा धानोरकर म्हणाल्या, “राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अवमान होत आहे. या घटनेचा मी निषेध करत असून असा अवमान करणाऱ्यांना आपण तात्काळ पदावरुन दूर केले पाहीजे. महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीमाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे, महाराष्ट्राचा मान-सन्मान मिळवून देण्यासाठी या प्रलंबित मागणीचा विचार करण्यात यावा. महापुरुषांचा अवमान होण्याकरिता भाजपाचे आयटी सेल जबाबदार आहे का? याचा तपास झाला पाहीजे”, अशी मागणी त्यांनी आपल्या भाषणात केली

विधानसभेत भाषण करताना आमदार प्रतिभा धानोरकर यांचे भाषण थांबविण्यासाठी उपाध्यक्षांनी बेल वाजवली. बेल ऐकताच आमदार प्रतिभा धानोरकर संतापल्या. “अध्यक्ष महोदय बेल वाजवू नका. विरोधी पक्षाकडून मी पहिली आमदार भाषण करत आहे. आपण सर्व वारंवार म्हणतो की, महिलांवरील अत्याचार थांबला पाहीजे. पण खरंतर सभागृहातच महिला आमदारांवर अत्याचार होत आहे. त्यामुळे बाहेरचा अत्याचार दूर राहिला आधी सभागृहातला अत्याचार थांबवा. त्यामुळे तुम्ही कितीही बेल वाजवली तरी मी थांबणार नाही.”, असे स्पष्ट करुन प्रतिभा धानोरकर यांनी आपले भाषण सुरु ठेवले.

चंद्रपूरचे काँग्रेस पक्षाचे खासदार सुरेश ऊर्फ बाळू धानोरकर यांच्या पत्नी असलेल्या प्रतिभा धानोरकर या २०१९ साली पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या. प्रतिभा धानोरकर यांचा जन्म ९ जानेवारी १९८६ रोजी यवतमाळ जिल्ह्यातील वणी तालुक्यातील परमडोह येथे झाला. सुरेश धानोरकर यांच्याशी विवाह झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात भाग घ्यायला सुरुवात केली. धानोरकर खासदार झाल्यानंतर त्यांच्या वरोरा विधानसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *