• Thu. May 9th, 2024

नाफेडने कांदा खरेदीच केला नाही, मुख्यमंत्र्यांची सभागृहात चुकीची माहिती; राष्ट्रवादीच्या आमदाराचा आरोप

Byjantaadmin

Mar 1, 2023

मुंबई: राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशीही कांद्याच्या मुद्यावरुन वातावरण तापण्याची शक्यता आहे. आज सकाळपासून महाविकास आघाडीच्या आमदारांनी पुन्हा एकदा विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठाण मांडून आंदोलनाला सुरुवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. एकनाथ शिंदे यांनी काल सभागृहात बोलताना राज्य सरकार कांदा उत्पादकांच्या पाठिशी खंबीरपणे उभे असल्याचे म्हटले होते. यावेळी त्यांनी नाफेडने कांदा खरेदी करण्यास सुरुवात केल्याची माहिती दिली. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिलेली माहिती खोटी असल्याचा दावा अनिल पाटील यांनी केला आहे. ते बुधवारी विधानभवाच्या प्रांगणात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

यावेळी अनिल पाटील यांनी नाफेड शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करत असल्याचा मुद्दा खोडून काढला. मुख्यमंत्री शिंदेंनी काल सभागृहात कांदा खरेदी प्रक्रिया सुरु झाल्याचे सांगितले. नाफेडने आतापर्यंत २,३१,००० मेट्रिक टन कांदा खरेदी केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, एकतर मुख्यमंत्र्यांना चुकीचं ब्रिफिंग करण्यात आलेले आहे किंवा त्यांनी सभागृहाला खोटी माहिती दिली आहे. नाफेडने खरेदी केलेला २,३१,००० मेट्रिक टन कांद्याची आकडेवारी ही गेल्यावर्षीची आहे. तर यंदा आता कुठे मुख्यमंत्र्यांनी कांदा खरेदीसाठी समिती नेमली आहे, ती समिती आता अहवाल देणार कधी, त्यावर कार्यवाही होणार कधी आणि नाफेड कांदा खरेदी करणार कधी, हा सवालच आहे. पण आजघडीला राज्यातील कोणत्याही कृषी उत्पन बाजार समितीमध्ये नाफेडमार्फत कांद्याची खरेदी सुरु नाही, असा दावा अनिल पाटील यांनी केला. त्यांचा हा आरोप गंभीर असून याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काही खुलासा करतात का, हे पाहावे लागेल.

विरोधकांनी आक्षेप घेतला पण फडणवीसांनी शांत बसवलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कांदा खरेदीबाबत सभागृहात आकडेवारी मांडत असताना महाविकास आघाडीच्या आमदारांनी त्यावर आक्षेपही घेतला होता. विरोधकांच्या गोंधळामुळे एकनाथ शिंदे यांना पुढे बोलता येत नव्हते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांची कांदा खरेदीची आकडेवारी योग्य असल्याचे छातीठोकपणे सांगितले होते. ही वस्तुस्थिती खरी नसेल तर विरोधकांनी हक्कभंग आणावा, असे आव्हानही देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना दिले होते.

http://jantaexpress.in/?p=4394

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *