• Sun. Apr 28th, 2024

यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस, महाराष्ट्रातही परिणाम जाणवणार

Byjantaadmin

Apr 30, 2023

पुणेः यंदाच्या मान्सून हंगामामध्ये दक्षिण आशियामध्ये सर्वसाधारण किंवा त्यापेक्षा कमी पावसाची शक्यता साउथ एशियन क्लायमेट आउटलूक फोरमच्या (सॅसकॉफ) वतीने वर्तवण्यात आली आहे. या अंदाजानुसार वायव्य, मध्य आणि उत्तर भारतात सरासरीपेक्षा कमी पाऊस होऊ शकतो. यांमध्ये महाराष्ट्राच्याही काही भागांचा समावेश आहे.

rain

दक्षिण आशियाई देशांमधील नऊ हवामानशास्त्रीय संशोधन संस्थांच्या संयुक्त विद्यमाने हा अंदाज जाहीर करण्यात आला आहे. ‘सॅसकॉफ’ची २५वी परिषद २७ ते २९ एप्रिलदरम्यान ऑनलाईन पार पडली. या परिषदेच्या अखेरीस यंदाच्या मान्सूनचा अंदाज जाहीर करण्यात आला. सॅसकॉफच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, प्रशांत महासागरातील तीन वर्षांची ला निनाची स्थिती संपून आता तिथे न्यूट्रल स्थिती सक्रिय झाली आहे. जगभरातील बहुतेक मॉडेलच्या अंदाजांनुसार मान्सून हंगामात एल निनोची स्थिती विकसित होण्याची शक्यता असून, एल निनोच्या काळात दक्षिण आशियाच्या बहुतेक भागांत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद होत असते.
‘सॅसकॉफ’च्या हंगामी अंदाजानुसार पाकिस्तान, नेपाळ, बांग्लादेशसह वायव्य, मध्य आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी मान्सून हंगामात सरासरीपेक्षा कमी पाऊस होण्याची शक्यता ३५ ते ४५ टक्के आहे. या विभागांमध्ये मध्य महाराष्ट्राचा बहुतेक भाग; तसेच मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांचा समावेश आहे. एका बाजूला एल निनोचे आगमन कधी होईल किंवा त्याची तीव्रता किती असेल यांबाबत नेमका अंदाज वर्तवला जात नसून, तर दुसरीकडे युरेशियामधील हिमवृष्टी आणि इंडियन ओशन डायपोल (आयओडी) हे घटक सर्वसाधारण मान्सूनची शक्यता वर्तवत आहेत. त्यामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाच्या अंदाजाची अचूकता कमी असल्याचे ‘सॅसकॉफ’चे म्हणणे आहे.

‘मेमध्ये तापमान जास्त, पाऊस कमी’

मे महिन्यामध्ये पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भारतात बहुतेक ठिकाणी कमाल तापमान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) वर्तवला आहे. कोकण आणि विदर्भात कमाल तापमान जास्त राहण्याची शक्यता असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात किमान तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला पाऊस मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत राहणार असून, त्यानंतर महाराष्ट्रासह मध्य भारतातील पावसाचे प्रमाण कमी होईल, असे ‘आयएमडी’ने म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *