• Tue. May 7th, 2024

शरद पवारच राष्ट्रवादीचे बॉस, निवृत्तीचा निर्णय मागे!

Byjantaadmin

May 5, 2023

मुंबई, 05 मे : मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू मी पुन्हा सरत शेवटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला निर्णय जाहीर केला आहे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा केल्यामुळे एकच गोंधळ उडाला. मागील 4 दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठकांचं सत्र सुरू होतं अखेरीस आज या राजीनामानाट्यावर पडदा पडला. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवृत्त होण्याची घोषणा मागे घेतली.

 

2 मे 2023 रोजी लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या प्रकाशन सोहळ्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय घेतला होता. मी सगळ्याच जबाबदारीतून मुक्त व्हावं अशी माझी इच्छा होती. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरिता माझे हितचिंतक माझ्यावर प्रेम आणि निष्ठा असणारे कार्यकर्ते चाहते यांनी संघटित होऊन एकमुखानं मला आवाहन केलं. विशेषतः महाराष्ट्रातून विविध राष्ट्रीय पक्षाचे कार्यकर्तेही भेटले, मी ही जबाबदारी पुन्हा घ्यावी ही त्यांनी इच्छा व्यक्त केली. मी अध्यक्षपद सोडू नये म्हणून सगळ्यांनी विनंती केली. राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये घेतलेला निर्णय या सगळ्यांचा विचार करू मी पुन्हा सरत शेवटी राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे, असं पवार म्हणाले.

शरद पवार यांचं संपूर्ण पत्र

दिनांक २ मे, २०२३ रोजी लोक माझे सांगाती’ ह्या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या अनावरण समारंभावेळी मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. सार्वजनिक जीवनातील सुमारे ६३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनतर भी सदर जबाबदारीतून मुक्त व्हावे अशी माझी भुमिका होती.

परंतू मी घेतलेल्या निर्णयाने जनमाणसामध्ये तीव्र भावना उमटली. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी व माझे सांगाती’ असलेल्या जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. मी निर्णयाचा फेरविचार करावा याकरीता माझे हितचिंतक, माझ्यावर प्रेम आणि विश्वास असणारे कार्यकर्ते असंख्य चाहते यांनी संघटित होऊन एकमुखाने काहींनी प्रत्यक्ष भेटून मला आवाहन केले. त्याचबरोबर देशभरातून व विशेषत: महाराष्ट्रातून विविध पक्षांचे सहकारी व कार्यकर्ते यांनी मी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा घ्यावी अशी आग्रही विनंती केली.

‘लोक माझे सांगाती’ हेच माझ्या प्रदीर्घ व समाधानी सार्वजनिक जीवनाचे गमक आहे. माझ्याकडून आपल्या भावनाचा अनादर होऊ शकत नाही. आपण दर्शवलेले प्रेम आणि विश्वास यामुळे मी भारावून गेलो आहे. माझ्या निर्णयापासून परावृत्त होण्यासाठी आपण सर्वांनी केलेली आवाहने व विनंत्या याचा विचार करून तसेच पक्षाने गठीत केलेल्या समितीने मी पुन्हा अध्यक्षपदी राहावे या निर्णयाचा देखील मान राखून मी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय मागे घेत आहे.

मी पुनश्चः अध्यक्षपद स्विकारत असलो तरी संघटनेमध्ये कोणतेही पद अथवा जबाबदारी सांभाळणारे उत्तराधिकारी निर्माण होणे आवश्यक असते असे माझे स्पष्ट मत आहे. माझ्या पुढील कार्यकाळात पक्षामध्ये संघटनात्मक बदल करणे, नव्या जबाबदाऱ्या सोपविणे, नवीन नेतृत्व निर्माण करणे यावर माझा भर असेल. यापुढे पक्षवाढीसाठी तसेच पक्षाची विचारधारा व ध्येयधोरणे जनमाणसापर्यंत पोचवण्यासाठी मी अधिक जोमाने काम

करील.. आपण सातत्याने दिलेली साथ हीच माझी खरी प्रेरणा आहे. माझ्या जीवनातील यशापशायात, सर्व प्रकारच्या आव्हानांशी मुकाबला करतेवेळी आपण माझे सांगाती राहिलात याबद्दल मी आपला कायम ऋणी राहिल. मी पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारत असल्याचे पुनश्च: जाहिर करतो. धन्यवाद ।

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *