• Fri. May 3rd, 2024

’16 आमदार अपात्र ठरले तर 6 वर्षे निवडणूक लढण्यास..’ सत्तासंघर्षावर याचिकाकर्त्याचं मोठं वक्तव्य

Byjantaadmin

May 5, 2023

अहमदनगर, 5 मे : सध्या राज्यातील राजकारण हे सत्तासंघर्षाच्या याचिकेच्या निर्णयावर अवलंबून आहे. या सत्तासंघर्षाच्या निकालाची वेळ आलेली आहे. कारण न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मेला निवृत्त होणार आहेत. त्याच्या आधी शनिवार-रविवार आहे. त्यामुळे 10 मेला कर्नाटकचे मतदान झाल्यानंतर 11 किंवा 12 तारखेला सत्तासंघर्षाबाबत निकाल लागु शकतो, असं याचिकाकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी म्हंटलं आहे. ते अहमदनगर येथे माध्यमांशी बोलत होते.

सत्तासंघर्षाच्या निकालाबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी हे वक्तव्य केलं. सोबतच आम्ही देखील एक नागरीक म्हणून आणि एक मतदार म्हणून याचिका दाखल केली आहे. ज्यात अपात्र ठरणाऱ्या आमदारांना पुढचे सहा वर्षे निवडणूक लढवण्यास बंदी घालावी जेणेकरून कुणीही निवडून येईल आणि आम्ही सत्ता स्थापन करू ही अरेरावी बंद होईल. यासाठी आम्ही देखील हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हे आमदार जर अपात्र ठरले तर इतरांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करता येईल का? याचीही चाचपणी सध्या सुरू असल्याचे सरोदे म्हणाले.

सध्या सत्तासंघर्षाबाबत विधानसभा अध्यक्षांकडे हा निर्णय सोपविण्याची शक्यता बोलली जात आहे. त्याबाबत बोलताना असीम सरोदे म्हणाले की, मला असं वाटत की हा निर्णय अध्यक्षांकडे सोपवू नये, मुळातच सध्याचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हेच घटनाबाह्य पद्धतीने अध्यक्ष झाले असल्याचे असीम सरोदे म्हणाले. स्वतः राहुल नार्वेकर यांनीच या प्रकरणाबाबत निर्णय घेण्यास नकार दिला पाहिजे, असं मतं असीम सरोदे यांनी व्यक्त केलं.

सध्या केरला स्टोरी या चित्रपटावरून नवा वाद सुरू झाला आहे. त्यामुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होत आहे. मुळातच सेन्सॉर बोर्ड अशा चित्रपटांना परवानगीच कसं देत हा प्रश्न पडतो, असं मत असीम सरोदे यांनी व्यक्त केलं. समाजात विष पेरण्याची सुपारी घेतलेले अक्षय कुमार सारखे लोक एक पाळीव आणि लाचार स्वरूपातील अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत, असा घणाघात असीम सरोदे यांनी केला. अशा लोकांकडून निर्माण होणारे कोणतेही सिनेमे नागरिकांनी पाहू नयेत असं आवाहन सरोदे यांनी केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *