• Thu. May 2nd, 2024

कर्नाटकात काँग्रेस सरकारचा भाजपला पहिला धक्का; धर्मांतर विरोधी कायदा गुंडाळला!

Byjantaadmin

Jun 15, 2023

कर्नाटकमध्ये भाजपचं सरकार उलथवून बहुमतानं सत्तेवर आलेल्या काँग्रेस सरकारनं भाजपला दणके द्यायला सुरुवात केली आहे. भाजप सरकारनं राज्यात आणलेला धर्मांतर विरोधी कायदा सिद्धरामय्या सरकारनं रद्द केला आहे. यानंतर गोहत्या प्रतिबंधक कायद्यातील कठोर तरतुदींकडं कर्नाटक सरकार मोर्चा वळवणार असल्याचं बोललं जात आहे.सिद्धरामय्या सरकारच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक केशव बळीराम हेडगेवार यांचं नाव शालेय पुस्तकांच्या अभ्यासक्रमातून काढून टाकण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला. ‘भाजप सरकारनं मागील वर्षी अभ्यासक्रमात काही बदल केले होते. ते सर्व बदल रद्द करण्यात आले आहेत. हेडगेवार यांच्याविषयी शालेय अभ्यासक्रमात जे काही समाविष्ट करण्यात आलं होतं, तेही काढून टाकण्यात आलं आहे, अशी माहिती कर्नाटकचे शालेय शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी दिली. याशिवाय, सर्व सरकारी, निमसरकारी आणि अनुदानित शाळा आणि महाविद्यालयांमध्ये राज्यघटनेची प्रस्तावना वाचणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

भाजपचा हल्लाबोल

धर्मांतरविरोधी कायदा रद्द करण्याच्या सिद्धरामय्या सरकारच्या निर्णयावर भारतीय जनता पक्षानं जोरदार हल्ला चढवला आहे. ‘या लोकांना मुस्लिमांची मतं हवी आहेत. सिद्धरामय्या यांचं सरकार हिंदूंच्या विरोधात आहे. हे लोक हिजाब पुन्हा लागू करू शकतात. अल्पसंख्याकांची मतं मिळवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात आणि प्रत्येक गोष्ट राजकारणाशी जोडू शकतात, अशी घणाघाती टीका माजी शालेय शिक्षणमंत्री बीसी नागेश यांनी केली.

 

गोहत्या प्रतिबंधक कायद्यावरही प्रश्नचिन्ह

काँग्रेस सरकार गोहत्या प्रतिबंध कायद्याचाही फेरआढावा घेण्याची शक्यता आहे. हा कायदा पूर्णपणे रद्द झाला नाही तरी त्यातील कठोर तरतुदी रद्द केल्या जाऊ शकतात, असंही बोललं जात आहे. म्हशींची कत्तल करता येते तर गायींची का नाही, असं वक्तव्य एका मंत्र्यानं अलीकडंच केलं होतं. त्यामुळंच काँग्रेस सरकार नेमकं काय करते हे पाहावं लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *