• Wed. May 1st, 2024

एकनाथ शिंदेंना जे महिनाभर आधीच माहिती होतं, त्याची फडणवीसांना जराशीही कल्पना नव्हती: नितीन देशमुख

Byjantaadmin

Jun 17, 2023

मुंबई: साधारण वर्षभरापूर्वी शिवसेनेत घडलेल्या बंडाविषयीची काही रंजक माहिती नव्याने समोर आली आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या यूट्युब चॅनलवर आदेश बांदेकर यांनी सत्तांतर नाट्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले आमदार नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांची मुलाखत घेतली. ही मुलाखत सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये नितीन देशमुख आणि कैलास पाटील यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर जे वरिष्ठ नेते शेवटपर्यंत उद्धव ठाकरे यांच्यासोबत थांबून राहिले होते, तीच टीम खरी सूत्रधार होती, असा दावा आमदार नितीन देशमुख यांनी केला.शिवसेनेतील बंड ही काही अचानक घडलेली गोष्ट नव्हती. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर सहा महिन्यांमध्येच या हालचाली सुरु झाल्या होत्या. आम्हाला या सगळ्याची कुणकुण अगोदरच लागली होती. हे सगळं सुरु असताना मी आणि माझा पीए एकदा बोललोही होतो. शिवसेनेचे २२ पेक्षा जास्त आमदार फुटणार नाहीत, असा आमचा अंदाज होता. पण इतक्या मोठ्याप्रमाणावर आमदार फुटतील, असे आम्हाला वाटले नव्हते. त्यावेळी शिवसेनेतील सगळे सिनिअर नेते एकत्र राहायचे. गुलाबराव पाटील सांगतात, आम्ही नंतर गेलो, संजय राऊत यांनी आम्हाला हाकलून दिले. पण माझं मतं असं आहे की, नंतर उद्धव ठाकरे यांच्यासोबत जे वरिष्ठ नेते थांबून होते, तेच बंडाचे खरे सूत्रधार होते. त्यासाठीच हे नेते मागे राहिले होते, असा गौप्यस्फोट नितीन देशमुख यांनी केला.

Shivsena Revolt Nitin Deshmukh

आम्हाला कुणकुण लागली होती, पण उद्धव साहेबांना सांगायची हिंमत झाली नाही: नितीन देशमुख

आम्हाला या सगळ्याची कुणकुण आधीच लागली होती. तेव्हा कैलास पाटील आणि माझ्यात चर्चा झाली होती. आम्ही कोणत्याही परिस्थितीत उद्धव ठाकरे साहेबांना सोडून जायचे नाही, हे ठरवले होते. आम्हाला हे सगळं माहिती असूनही उद्धव साहेबांना सांगायची आमची कधी हिंमत झाली नाही. आम्ही पहिल्यांदा आमदार झालो होतो, त्यामुळे या गोष्टी त्यांच्याशी कशा बोलायच्या, असे आम्हाला वाटले. तरीही आम्हाला वाटलं एवढं होणारच नाही. संतोष बांगरही आमच्यासोबत होते. आपण त्यांच्यासोबत गेले नाही पाहिजे, अशी चर्चा आमच्यात झाली. तेव्हा शिवसेनेतील वरिष्ठ नेते बोलायचे की, आपण पुन्हा भाजपसोबत जाण्यासाठी उद्धव ठाकरे यांची मनधरणी करू. पण पक्षात एवढे मोठे बंड होईल, हे आम्हाला वाटले नव्हते, असे नितीन देशमुख यांनी म्हटले.

एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळणार, हे देवेंद्र फडणवीसांना माहिती नव्हते: नितीन देशमुख

देवेंद्र फडणवीस सांगतात की, मुख्यमंत्रीपदासाठी मी एकनाथ शिंदे यांचे नाव सुचवले. पण त्यांचा हा दावा खोटा आहे. देवेंद्र फडणवीस यांना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद मिळेल, हे कदाचित माहिती नव्हते. देवेंद्र फडणवीस यांना केवळ सरकार पाडायचं, हे माहिती होतं. बाकी सगळी सूत्रं दिल्लीतून हलवली जात होती. पण मुख्यमंत्री कोण होणार, हे देवेंद्र फडणवीस यांना माहिती नव्हते. याउलट एकनाथ शिंदे यांना सत्तांतराच्या एक महिना आधीच ते मुख्यमंत्री होणार हे माहिती होते. स्वत: एकनाथ शिंदे यांनी मला ही गोष्ट सांगितली होती, असा दावा नितीन देशमुख यांनी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *