• Wed. May 1st, 2024

मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? देवेंद्र फडणवीस हसले आणि म्हणाले…

Byjantaadmin

Jun 17, 2023

धाराशिव : ‘राज्यात लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाईल,’ असे उपमुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पांगदरवाडी (ता. तुळजापूर) येथे सांगितले. राज्यातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सातत्याने सुरू आहे. मात्र, त्याबाबत ठोसपणे कोणीही भाष्य केले नव्हते. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या यंत्रपूजनासाठी आले असता फडणवीस यांनी, ‘राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार केला जाईल,’ असे सांगितले. राणा जगजितसिंह पाटील यांचा मंत्रिमंडळात समावेश होईल, का असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर फडणवीस यांनी त्रोटक शब्दांत वरील उत्तर दिले.

श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा घेतला. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना फडणवीस म्हणाले, ‘सोलापूर – तुळजापूर-धाराशिव रेल्वेमार्ग पूर्ण व्हावा यासाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी मोठा पाठपुरावा केला. केंद्र सरकारनेही मोठी केली. राज्याचा हिस्सा मंजूर केला आहे. लवकरच हे काम पूर्ण होईल.’गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे यंत्रपूजन केले. मराठवाड्याच्या न्यायहक्काचे पाणी वर्षभरात शेतशिवारात दाखल होईल,’ असा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी पांगरदरवाडी (ता. तुळजापूर) येथे केला.

आमदार प्रवीण दरेकर, राणा जगजितसिंह पाटील, अभिमन्यू पवार, संभाजी पाटील निलंगेकर, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जलसंपदा विभागाचे कार्यकारी संचालक संतोष तीरमनवार, मुख्य अभियंता विजय घोगरे, अधीक्षक अभियंता भारत शिंगाडे आदी या वेळी उपस्थिती होती.

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘तहानलेल्या मराठवाड्याला देण्याबरोबरच कृष्णा भीमा स्थिरीकरण योजनेचे पाणी उजनी धरणात आणले जाणार आहे. त्यासाठीचा प्रस्ताव जागतिक बँकेकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे मराठवाड्याला आणखी मुबलक पाणी मिळेल.’

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *