• Wed. May 1st, 2024

सरस्वतीचे तुकडे मिक्सरमध्ये बारीक करून कुकरमध्ये शिजवण्यापूर्वी तिला ताकात विष देऊन केले होते ठार, मनोज सानेचा खुलासा

Byjantaadmin

Jun 17, 2023

मुंबईतील मीरा रोडच्या सरस्वती हत्याकांडाने अवघा देश हादरला आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिचा लिव्ह इन पार्टनर आणि कथित पती मनोज सानेला बेड्या ठोकल्यात. त्यानंतर आता या प्रकरणी विविध खुलासे होत आहेत. पोलिसाच्या माहितीनुसार, मनोज सानेने सरस्वतीची हत्या केल्यानंतर तिच्या मृतदेहाचे तुकडे केले. तत्पूर्वी, ताकातून किटकनाशक देऊन तिची हत्या केली.

ताकातून दिले विष

मनोज सानेने आपली लिव्ह इन पार्टनर सरस्वती वैद्यची हत्या करण्याचा कट रचला होता. यासाठी त्याने बोरीवलीतील एका दुकानातून किटनाशक खरेदी केले. हे किटकनाशक ताकात मिसळून त्याने सरस्वतीला दिले. हे ताक पिल्यानंतर तिचा मृत्यू झाला. त्यानंतर अटक झाल्यानंतर मनोजने तिने आत्महत्या केल्याचा दावा करत पोलिसांची दिशाभूल केली. तसेच आपण या प्रकरणी पकडले जाऊ नये म्हणून तिच्या मृतदेहाचे तुकडे करून नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असेही सांगितले. पण आता मनोजनेच सरस्वतीला ताकातून किटकनाशक देऊन ठार केल्याचे व त्यानंतर तिचे तुकडे केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनीच हे स्पष्ट केले आहे.

दुकानदाराने ओळख पटवली

‘इंडियन एक्सप्रेस’ने पोलिसांचा दाखला देत आपल्या वृत्तात म्हटले आहे की, आरोपीने बोरीवलीतील एका दुकानातून किटकनाशक खरेदी केले. या दुकानदाराने आरोपीला ओळखले आहे. कारण, किटकनाशकाची विक्री केल्यानंतर त्याचे नाव, बॅच नंबर आदी गोष्टींची नोंद रजिस्टरमध्ये करावी लागते. सानेच्या घरी आढळलेले किटकनाशकावरील तपशील या नोंदीसारखाच आहे. त्याचा डबाही आरोपीच्या घरातून जप्त करण्यात आला आहे.

काही तुकडे गॅसवर भाजले

आरोपी मनोज सानेने 4 जून रोजी किटकनाशक देऊन सरस्वती वैद्यची हत्या केली. त्यानंतर तिच्या मृतदेहाचे अनेक तुकडे केले. त्यापैकी काही तुकडे गॅसवर भाजले, तर काही नाल्यात फेकून दिले. 7 जून रोजी त्याच्या घरातून प्रचंड दुर्गंधी येण्यास सुरुवात झाली. त्यामुळे शेजाऱ्यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी दरवाजा उघडून आतील प्रकार पाहिला असता त्यांच्या पायाखालची वाळूच सरकली.

मृतदेहाला लावले निलगिरीचे तेल

मनोज सानेने सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर तिच्या मृतदेहाला निलगिरीचे तेल लावले. तसेच दुर्गंधीचा वास येऊ नये म्हणून घरात मोठ्या प्रमाणात रुम फ्रेशनरही फवारले. पोलिसांनी त्याच्या घरातून निलगिरी तेलाच्या 5 बाटल्या जप्त केल्या आहेत. तसेच त्याने ज्या दुकानातून ताक व निलगिरी तेल विकत घेतले होते, त्या दुकानदाराचे जबाबही नोंदवले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *