• Thu. May 9th, 2024

तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने हृद्य निरोप

Byjantaadmin

Jul 31, 2023

तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांना जिल्हा प्रशासनाच्यावतीने हृद्य निरोप आयुष्यातले अविस्मरणीय क्षण लातूरने दिले;

लातूरची सेवा संस्मरणीय राहील – पृथ्वीराज बी. पी.

 

मागच्या काळातील अपूर्ण कामे प्राधान्याने पूर्ण करणार; लातूरच्या विकास कामाचा वारसा कायम ठेवू– जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर – घुगे

 

लातूर, दि. 31 (जिमाका) : आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण लातूर जिल्ह्याचा जिल्हाधिकारी म्हणून काम करताना मिळाले, लातूरमध्ये सेवा करताना आलेले अनुभव मला समृद्ध करणारे ठरले. लातूर जिल्ह्याने दिलेले प्रेम माझ्या आयुष्यात संस्मरणीय राहील, अशी हृद्य भावना नागपूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा लातूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. यांनी व्यक्त केली. त्यांच्या निरोप समारंभानिमित्त आणि नूतन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांच्या स्वागत समारंभानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

नूतन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे, जिल्हा परिषदेचे नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, नूतन अप्पर जिल्हाधिकारी सुनील यादव, प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी नयन गोयल, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यावेळी उपस्थित होते.लातूर जिल्ह्यात प्रशासनात काम करण्याचा आपला अतिशय चांगला अनुभव असून सर्व विभाग समन्वयातून काम करत असल्यामुळे अनेक विभागातून अत्यंत चांगले काम होते. जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यात उत्तम समन्वय असल्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर जिल्ह्याचा गौरव झाला असल्याची बाब यावेळी पृथ्वीराज बी. पी. यांनी अधोरेखित केली.प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या सहकार्याने बहुप्रलंबित शेत रस्त्याचे उत्तम काम जिल्ह्यात झाले. अनुकंपाची भरती पूर्ण करून ती शून्यावर आणता आली. कुळाच्या नोंदी, महसूली कामाचे डिजटलायझेशन ही महत्वाची कामे पूर्ण झाली. गेल्या अडीच वर्षात आपल्या कार्यकाळात झालेली कामे अत्यंत समाधान देणारी झाल्याचा उल्लेख पृथ्वीराज बी. पी. यांनी यावेळी केला. अडीच वर्षाच्या सेवा काळात ज्यांचे-ज्यांचे सहकार्य लाभले त्यांचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करून तुमचा सर्वांचा स्नेह कायम सोबत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.पृथ्वीराज बी. पी. यांच्या काळात जी कामे सुरु झाली ती तेवढ्याच गुणवत्तापूर्ण पद्धतीने, वेगाने पूर्ण करू, अशी ग्वाही देऊन लातूर जिल्हा हा या महसूल विभागातला अत्यंत चांगला आणि गुणवत्तापूर्ण काम करणारा जिल्हा आहे. माझी काम करतानाची भूमिका पालकाची आहे. काम करणाऱ्यांना प्रोत्साहन, न काम करणाऱ्याचे कान ओढून काम करायला लावणारी असेल. कमी बोलून काम अधिक करून दाखवावे, अशी माझी भूमिका असणार असल्याचे जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे यांनी यावेळी स्पष्ट केले. काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभी असेन, अशी ग्वाहीही यावेळी जिल्हाधिकारी यांनी दिली.यावेळी विविध विभागांच्यावतीने पृथ्वीराज बी. पी. यांचा कृतज्ञतापूर्वक गौरव करण्यात आला. नूतन जिल्हाधिकारी श्रीमती वर्षा ठाकूर-घुगे आणि अपर जिल्हाधिकारी सुनील यादव यांचे स्वागत करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी विजयकुमार ढगे यांनी केले. सर्व महसूल संघटनाचे प्रतिनिधी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी यांच्या तर्फे प्रतिनिधिक मनोगत व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *