• Mon. Apr 29th, 2024

निलंगा येथे महाराष्ट्र महाविद्यालयात लघुपट व माहितीपट महोत्सव

Byjantaadmin

Jan 12, 2024
निलंगा येथे महाराष्ट्र महाविद्यालयात लघुपट व माहितीपट महोत्सव
निलंगा: येथील महाराष्ट्र महाविद्यालयात “महाराष्ट्र महाविद्यालय कॅम्पस फिल्म सोसायटी” यांच्या वतीने दि. १२ व १३ जानेवारी रोजी दोन दिवसीय लघुपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले असून या महोत्सवाचे उद्घाटन मुंबई येथील ख्यातनाम सीने समीक्षक, ज्युरी व लेखक श्री. अशोक राणे यांच्या हस्ते होणार आहे.
      श्री. अशोक राणे यांना त्यांच्या चित्रपट विषयक लेखन आणि कार्यासाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले असून याप्रसंगी त्यांचे चित्रपट आणि माहितीपट रसग्रहण या विषयावर विद्यार्थ्यांना विस्तृत असे मार्गदर्शन देखील होणार आहे. उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री. विजय शिवाजीराव पाटील निलंगेकर असतील तर कार्यक्रमाला लातूर येथील प्रसिद्ध सिने अभ्यासक श्री शाम जैन तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एन. एन. कोलपुके यांची प्रमुख उपस्थिती असेल.
       दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना देश विदेशातील अनेक दर्जेदार आणि आशयसंपन्न असे लघुपट व माहितीपट दाखवून त्यावर विश्लेषणात्मक चर्चा घडवून आणण्यात येणार आहे.
या महोत्सवाची सांगता यावर्षीचा राष्ट्रीय पुरस्कार विजेता सर्वोत्कृष्ट लघुपट “रेखा” याने होत असून या लघुपटावर विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या लघुपटाचे राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक श्री शेखर रणखांबे हे स्वतः उपस्थित राहणार आहेत. या प्रसंगी त्यांची प्रकट मुलाखत होणार आहे.
      या महोत्सवाच्या समारोप कार्यक्रमाला श्री. शेखर रणखांबे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहत आहेत. तर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षण समितीचे सचिव श्री. बब्रुवान सरतापे हे असणार आहेत. लातूर जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन महोत्सवाचे मुख्य आयोजक प्राचार्य डॉ एम. एन. कोलपुके, महोत्सवाचे संयोजन सचिव व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. डी. एस. चौधरी, संयोजन सचिव तथा सहसमन्वयक डॉ. एन. व्ही. पिनमकर, संयोजन सचिव डॉ. जी. जी. शिवशेट्टे व आयोजन समितीतील सर्व सदस्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *