• Fri. May 3rd, 2024

टोयोटा’ला लोकप्रिय करणारा उद्योजक काळाच्या पडद्याआड, विक्रम किर्लोस्कर यांचं निधन

Byjantaadmin

Nov 30, 2022

नवी दिल्ली : वाहन उद्योगातील अग्रणी उद्योजक विक्रम किर्लोस्कर यांचं निधन झालं आहे. वयाच्या ६४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, विक्रम किर्लोस्कर यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला होता. टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. टोयोटा कार भारतात लोकप्रिय करण्याचे श्रेय त्यांनाच जातं. आपल्या कार्यकुशल नेतृत्वाने त्यांनी टोयोटाला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यांच्या पश्चात पत्नी गीतांजली किर्लोस्कर आणि मुलगी मानसी किर्लोस्कर असा परिवार आहे.

विक्रम किर्लोस्कर यांनी ‘एमआयटी’मधून मेकॅनिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली होती त्यांनी CII, SIAM आणि ARAI मध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. विक्रम किर्लोस्कर हे किर्लोस्कर समूहाच्या चौथ्या पिढीचे प्रमुख होते. ते किर्लोस्कर सिस्टम्स लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकही होते. तसेच टोयोटा किर्लोस्कर मोटर प्रायव्हेट लिमिटेडचे ते उपाध्यक्ष होते. २५ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबईतील टोयोटा इनोव्हा हायक्रॉसच्या एका कार्यक्रमात विक्रम किर्लोस्कर हे शेवटचे सार्वजनिक व्यासपीठावर आले होते.

टोयोटा इंडियाने मीडिया निवेदन जारी करून विक्रम किर्लोस्कर यांच्या मृत्यूबद्दल माहिती दिली आहे. २९ नोव्हेंबर २०२२ रोजी टोयोटा किर्लोस्कर मोटरचे उपाध्यक्ष विक्रम एस किर्लोस्कर यांच्या अकाली निधनाबद्दल आम्हाला कळवताना अत्यंत दु:ख होत आहे. या दुःखाच्या प्रसंगी त्यांच्या आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. आम्ही त्यांच्या कुटुंबीयांप्रति आणि मित्रांप्रति आमच्या मनापासून संवेदना व्यक्त करतो. विक्रम किर्लोस्कर यांच्यावर ३० नोव्हेंबर २०२२ रोजी दुपारी १ वाजता हेब्बल स्मशानभूमी, बेंगळुरू येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *