• Fri. Apr 26th, 2024

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी

Byjantaadmin

Oct 4, 2022

विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी

मेंदुच्या कॅन्सरच्या दोन रुग्णांना मिळाले जीवनदान, कॅन्सरच्या चौथ्या स्टेजवर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी

लातूर दि. 4 ( जिमाका ) 65 वर्षीय आजोबा बेशुध्द अवस्थेत अचानक उजव्या हाताची आणि पायाची ताकद कमी झाल्यामुळे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयामध्ये मागील आठवडयामध्ये दाखल झाले असता त्यांची MRI सारख्या योग्य सर्व तपासणी अंती रुग्णास मेंदुच्या डाव्या बाजूस कर्करोगाची गाठ झाल्याचे निदान झाले असता त्वरित या महाविद्यालयातील मेंदुतज्ञ डॉ. नितिन बरडे यांनी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेवून शस्त्रक्रिया यशस्वीकरित्या पार पाडली. शस्त्रक्रिया नंतर सातव्या दिवशी रुग्ण पायी चालत घरी गेला. अशाप्रकारची अत्यंत गुंतागुंतीची व खर्चिक कर्करोगाची पहिलीच शस्त्रक्रिया या रुग्णालयामध्ये पार पडली.

तसेच 60 वर्षीय आजी दि.01/10/2022 रोजी मेंदुच्या कर्करोगाची गाठ मेंदमुध्ये पसरुन कवठीच्या बाहेर आली असता या रुग्णालयात दाखल झाल्या होत्या. सदर रुग्णांची MRI व इतर तपासण्या व चाचण्या करुन त्यांच्यावर त्वरीत शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला व सदरील शस्त्रक्रिया डॉ. नितिन बरडे, मेंदुविकारतज्ञ यांनी यशस्वीरीत्या पार पडली.

वरील दोन्ही रुग्णांचे वय जास्त होते व मेंदुच्या कर्करोगाचा गंभीर स्वरुपाचा (Stage 4) चा आजार असल्यामुळे या आजाराच्या शस्त्रक्रियेमधून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण खूप कमी आहे तरीसुध्दा डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. नितिन बरडे, मेंदुविकारतज्ञ व शल्यचिकित्साशास्त्र विभागाचे विभागप्रमुख डॉ. जी.एल. अनमोड, डॉ.जी.ए.स्वामी, डॉ.एम.जे.चावडा, डॉ. आर.जे. कासले, भुलतज्ञ डॉ. शैलेंद्र चौहान, डॉ. जोशी, डॉ. देशमुख व परिचर्या यांच्या देखरेखीखाली रुग्णाच्या मेंदूच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया यशस्वी पार पडली. या दोन्ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत करण्यात आल्या असून या शस्त्रक्रियेसाठी लागणारे यंत्रसामुग्री व इतर साहित्य उपलब्ध करुन देऊन डॉ.मेघराज चावडा, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांनी विशेष सहकार्य केले.

अशाप्रकारची शस्त्रक्रिया या रुग्णालयात पहिल्यांदाच झाली असून अशाप्रकारच्या मेंदुच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियाचा लाभ लातूर व आजूबाजूच्या जिल्हयातील नागरिकांनी घ्यावा असे आवाहन विलाराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर देशमुख यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *