• Thu. May 2nd, 2024

पिक विमा व नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन

Byjantaadmin

Jun 16, 2023
पिक विमा व नुकसान भरपाई तात्काळ मिळावी अन्यथा तीव्र आंदोलन- प्रा. अण्णासाहेब मिरगाळे
निलंगा-  खरीप 2022- 23 चा पिकविमा, मार्च महिन्यात अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाचे अनुदान,प्रधानमंत्री सन्मान निधीचे तीन हफ्ते  शेतकऱ्यांना तात्काळ मिळावेत व महात्मा फुले कर्जमुक्तीचे पैसे खात्यावर तात्काळ वर्ग करावेत अशा आशयाचे निवेदन युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे यांच्या वतीने निलंगा तहसीलदाराना निवेदन देण्यात आले.
 निलंगा तालुक्यातील खरीप 2022- 23 चा पिक विमा भरून एक वर्ष होत आहे,अद्याप पर्यंत हजारो शेतकऱ्यांना पिकविमा मिळालेला नाही. तो पिकविमा तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावा व फेब्रुवारी, मार्च 2023 मध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या गहू व ज्वारी पिकाचे अतोनात नुकसान झाले होते, त्या नुकसानीचे पंचनामे करून तीन महिने झाले असून अद्याप पर्यंत शेतकऱ्यांना नुकसान भरपाईचे अनुदान शासनाकडून मिळालेले नाही, ते अनुदान तात्काळ शेतकऱ्याच्या खात्यात वर्ग करावा, खरीप पेरणीसाठी शासनाकडून महाबीजचे बियाणे खतविक्रेत्यांना दिले असून खतविक्रेत्याकडून मनमानी भावाने महाबीजचे बियाणे बाजारात विक्री केले जात आहे, कोणत्या विक्रेत्याकडे किती साठा शिल्लक आहे व कोणास विक्री केली आहे याचा थांगपत्ता नाही, याची तात्काळ चौकशी करावी, महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेचे आधार प्रमाणीकरण करून तीन महिने झाले असताना सुद्धा आजतागायत शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचे पैसे मिळाले नाहीत ते तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करावेत, प्रधानमंत्री सन्मान निधीचे चार महिन्यानंतर मिळणारे दोन हजार रुपये अनुदान तांत्रिक समस्येमुळे हजारो शेतकऱ्यांना नववा, दहावा व अकरावा हप्ता आजतागायत मिळाला नाही, तात्काळ तांत्रिक दोष दूर करून प्रधानमंत्री सन्मान निधीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावेत, शेतकऱ्यांचा खरीप पिकविमा व गहू व ज्वारी नुकसानीच्या अनुदानाची रक्कम तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करावी अन्यथा शिवसेना व युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. आण्णासाहेब मिरगाळे यांनी तहसीलदारांना निवेदनाद्वारे दिला आहे.निवेदन देताना सोबत युवासेनेचे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, महिला तालुका संघटिका रेखाताई पुजारी,शहर प्रमुख दैवत सगर, अल्पसंख्यांक तालुकाप्रमुख लाईकपाशा शेख, माजी तालुकाप्रमुख बालाजी माने, मनोज तांबाळे, माधव मोरे, बब्रुवान सारगे, प्रदीप पाटील, मंगलबाई कांबळे, नामदेव शिरसले, शुभम डांगे इत्यादी शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *