• Wed. May 1st, 2024

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, आमदार मनीषा कायंदे शिंदे गटात करणार प्रवेश

Byjantaadmin

Jun 18, 2023

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या विश्वासू आणि ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे या लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे. आमदार कायंदे या सध्या नॉट रिचेबल असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्या शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळं आता मुंबईसह नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसला आहे. तसेच शिंदे गटात प्रवेश करणाऱ्या मनीषा कायंदे या पहिल्या विधानपरिषदेच्या आमदार ठरल्या आहे. त्यामुळं आता आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटाच्या विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे गेल्या काही दिवसांपासून पक्षनेतृत्वावर नाराज होत्या. त्यामुळं त्या येत्या काही दिवसांतच उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. शिवसेनेच्या वर्धापण दिनाच्या सोहळ्याला आमदार मनीषा कायंदे यांनी दांडी मारली होती. त्यांचा मोबाईल नॉट रिचेबल असून ठाकरे गटाच्या नेत्यांचा त्यांच्याशी संपर्क होत नसल्याची माहिती आहे. मनिषा कायंदे यांच्याकडून याबाबत कोणतेही अधिकृत भाष्य करण्यात आलेलं नाही.आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला तर ठाकरे गटाला मुंबईसह नाशिकमध्ये मोठा राजकीय धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार कायंदे यांच्यासह ठाकरे गटाचे माजी तीन नगरसेवकही शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळं मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वीच ठाकरे गटाला शिंदे गट मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. आमदार मनीषा कायंदे यांच्या पक्षांतरावरून संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. कचरा इकडे तिकडे उडत असतो. तो कचरा हवेचा झोका बदलल्यानंतर आमच्या दारात येऊन पडतो. त्यामुळं त्याकडे फारसं लक्ष देण्याची गरज नाही, असं म्हणत राऊतांनी मनीषा कायंदे यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *