• Sun. May 5th, 2024

ग्रामीण भागात ‘कॉपी’वर चालणारी कनिष्ठ महाविद्यालयांची दुकानदारी बंद करा

Byjantaadmin

Jun 21, 2023

ग्रामीण भागात ‘कॉपी’वर चालणारी
कनिष्ठ महाविद्यालयांची दुकानदारी बंद करा
मराठवाडा पालक संघाची मुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे मागणी
लातूर, दि. २१ – बारावीच्या वर्गात प्रवेश देऊन विद्यार्थ्याला चांगले गुण मिळवून देण्याची हमी देत पालकांकडून मनमानी शुल्क उकळणार्‍या शिक्षण संस्थांचे पेव लातूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढले आहे. या प्रवृत्तीमुळे गुणवत्तेच्या ‘लातूर पॅटर्न’ला काळीमा फासला जात आहे. कनिष्ठ महाविद्यालयाची दुकानदारी बंद करण्याची मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांमार्फत मुख्यमंत्री व शिक्षणमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अशी परीक्षा केंद्रे झुम ऍपद्वारे ऑनलाईन करून विभागीय नियंत्रण मंडळाशी जोडण्याची मागणी करण्यात आली.
लातूर जिल्हा शिक्षणाच्या गुणवत्तेची खाण असल्याची प्रचिती दरवर्षी दहावी – बारावीच्या निकालावरून येत आहे. यामुळे अकरावी – बारावीसह नीट व जेईईचा अभ्यास करण्यासाठी राज्यासह देशभरातील विद्यार्थी येथे शिक्षणासाठी येतात.
लातूर शहरात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. परंतु, लातूर शहरातील महाविद्यालयांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश मिळू शकत नाही. ग्रामीण भागातील महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेऊन शहरात खासगी शिकवणी लावण्यासाठी केवळ नावाला प्रवेश घेण्यात येतो. त्याचप्रमाणे बारावीची बोर्ड परीक्षा प्रवेश घेतलेल्या महाविद्यालयातील केंद्रावर द्यावी लागते. यात विद्यार्थ्यांना कॉप्या पुरवून त्यांना चांगले गुण मिळवून देतो, असे आश्‍वासन दिले जाते. सर्रासपणे ग्रामीण कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये कॉपी देऊन उत्तीर्ण करण्याचे प्रकार अनेक परीक्षा केंद्रांवर चालतात. यातून पालकांची अशा महाविद्यालयांकडून आर्थिक लूट होते. या महाविद्यालयांच्या या नव्या दुकानदारीमुळे गुणवत्तेच्या ‘लातूर पॅटर्न’ला काळीमा फासला जात आहे. हा प्रकार रोखण्यासाठी परीक्षा नियंत्रण मंडळाने ग्रामीण भागातील परीक्षा केंद्रे झुम ऍपद्वारे ऑनलाईन करावीत, अशी मागणी मराठवाडा पालक संघाच्यावतीने जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष सुधाकर तेलंग यांना पाठविण्यात आल्या आहेत. निवेदनावर मराठवाडा पालक संघाचे अध्यक्ष डॉ. भारत घोडके यांची स्वाक्षरी आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *