• Sun. Apr 28th, 2024

सरकारचा मोठा निर्णय:शिंदे गटाचे आमदार, खासदारांना वाय प्लस सुरक्षा; अमृता फडणवीसांना एक्स

Byjantaadmin

Oct 31, 2022

शिंदे गटाचे 41 आमदार आणि 10 खासदारांना वाय प्लस सुरक्षा देण्याचा अतिशय महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. एकीकडे महाविकास आघाडीतल्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात केलेली असताना, आता सरकारचा हा निर्णय कळीचा मुद्दा ठरण्याची शक्यताय.

उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री अशा दोन्ही पदाचा कार्यभार असणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या खात्याने हा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेततही वाढ करण्यात आली आहे.

अशी असेल सुरक्षा

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा ठेवण्यात आली आहे. उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यांना आता वाय प्लस ऐवजी एक्स दर्जाची सुरक्षा असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनाही वाय सुरक्षा असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे, उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे, त्यांचा मुलगा तेजस ठाकरे यांनाही वाय प्लस सुरक्षा असेल

हजारेंना झेड सुरक्षा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अगोदरपासूनच झेड दर्जाची सुरक्षा आहे. ती या सरकारने कायम ठेवली आहे. एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देणारे रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे. तर अंबानी कुटुंबाला झेड प्लस आणि अभिनेता सलमान खानला वाय प्लस सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

यांच्या सुरक्षेत कपात

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्याशी संबंधित प्रकरणाची चौकशी करणारे जस्टीस के. यू. चांदिवाल यांची सुरक्षा सरकारने काढली आहे. तर काँग्रेस नेते अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शरद पवार यांच्या सुरक्षेत पूर्वीच कपात करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *