• Sat. Apr 27th, 2024

रवी राणांची अखेर माघार:फडणवीसांच्या भेटीनंतर म्हणाले- बच्चू कडूंबद्दलचे शब्द मागे घेतो

Byjantaadmin

Oct 31, 2022

गेल्या 8-10 दिवसांपासून सुरू असलेल्या रवी राणा व बच्चू कडू वादावर अखेर पडला आहे. आज सकाळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर रवी राणा यांनी बच्चू कडूंबद्दल आपण जे काही शब्द बोललो ते मागे घेत असल्याचे सांगितले.

तसेच, बच्चू कडूंवर खोके घेतल्याचा आरोप केल्याबद्दल रवी राणांनी दिलगिरीही व्यक्त केली. मात्र, बच्च कडूंनीदेखील आपल्याविरोधात अपशब्द वापरले. तेदेखील आता आपले शब्द जाहीररीत्या मागे घेतली, अशी अपेक्षाही रवी राणा यांनी व्यक्त केली.

फडणवीसांचे आदेश

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर आज रवी राणा यांनी त्यांची भेट घेतली. यानंतर पत्रकारांशी बोलताना रवी राणा यांनी सांगितले की, गेल्या 8-10 दिवसांपासून बच्चू कडू आणि माझ्यात वाद सुरू होते. शब्दाला शब्द लागत होते. या वादासंदर्भात काल जवळपास साडे तीन तास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली. तसेच, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आज चर्चा केली. दोघांनी आपापले वाद मिटवण्याचे सांगितले आहे. शिंदे व फडणवीस दोघेही माझे नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या आदेशानुसार दिलगिरी व्यक्त करत हा विषय आता संपवत आहे.

रवी राणा यांनी सांगितले की, बच्चू कडू आणि मी दोघेही सरकारसोबत आहे. दोघेही एकाच जिल्ह्यातील प्रतिनिधी आहोत. बच्चू कडू यांच्या गुवाहाटी दौऱ्यासंदर्भात मी जी काही टीका केली, त्यामुळे नकळत शिंदे गटाच्या आमदारांच्याही भावना दुखावल्या गेल्या. बच्चू कडू, कडूंसोबतचे अपक्ष आमदार तसेच शिंदे गटातील आमदारही माझे सहकारी आहेत. त्यामुळे त्यांच्या भावना दुखावल्या गेल्याने मी माझे शब्द परत घेतो.

रवी राणा यांनी यावेळी बच्चू कडूंनीही माझ्याविरोधात जे अपशब्द वापरले ते मागे घेण्याची अपेक्षा व्यक्त केली. रवी राणा म्हणाले, बच्चू कडू यांच्या तोंडूनसुद्धा माझ्याविरोधात अपशब्द निघाले. मी खिसे कापून लोकांना किराणा वाटतो, असा आरोप कडूंनी केला. आता तेदेखील आपले शब्द माघे घेतली, अशी अपेक्षा आहे. आम्ही दोघेही सरकारसोबत, मुख्यमंत्री शिंदे व देवेंद्र फडणवीसांसोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत.

राणांनी काय टीका केली होती?

अमरावती येथील एका जाहीर सभेत रवी राणांनी बच्चू कडूंवर आरोप केला होता की, ‘बाप बडा ना भैय्या, बच्चू कडूंसाठी सबसे बडा रुपय्या’. खोके मिळाल्यामुळेच बच्चू कडू काही अपक्ष आमदारांना घेऊन गुवाहाटीला गेले व शिंदे गटात सामील झाले. रवी राणांच्या या आरोपांमुळे बच्चू कडू चांगलेच संतापले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *