• Sat. Apr 27th, 2024

नरेंद्र मोदींचा जुना व्हिडीओ व्हायरल; बंगालमधला पूल पडल्यानंतर म्हणाले होते…

Byjantaadmin

Oct 31, 2022

गुजरातच्या मोरबीमधील पूल दुर्घटनेतील मन हेलावून टाकणारी दृश्य समोर आली आहेत. मच्छू नदीवरील या पूल दुर्घटनेत आत्तापर्यंत 190 लोकांनी जीव गमावला आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींचा एक जुना व्हिडीओ राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते आणि माजी पत्रकार विनोद कापरी यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओत पूल पडल्यानंतर मोदी पश्चिम बंगाल सरकारवर टीका करताना दिसत आहेत

पूल पडल्याची घटना ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ नाही, तर ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’ आहे. हा ‘अ‍ॅक्ट ऑफ फ्रॉड’चा परिणाम आहे. निवडणुकीच्या दरम्यान हा पूल पडणं खरं तर ‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ आहे. यांनी कसं सरकार चालवलं हे माहित व्हावं, यासाठी हा देवाचा संदेश आहे”, अशी टीका मोदींनी या व्हिडीओत केली आहे.

दरम्यान, एका जुन्या घटनेचा व्हिडीओ मोरबीचा असल्याचे सांगितले जात असल्याचा आरोप कापरी यांनी केला आहे. २७ वर्षांपासून हेच ‘गुजरात मॉडेल’ विकलं जात असल्याची टीका त्यांनी केली आहे. या घटनेबाबत कुणालाही प्रश्न विचारण्यात आले नाहीत, तर कुणाचाही राजीनामा घेण्यात आला नाही, असेही टीकास्र त्यांनी गुजरात सरकारवर सोडलं आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही दुर्घटना घडली आहे. याचा परिणाम निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. दरम्यान, मोरबीमधील या दुर्घटनेआधी काही तरुण मुद्दाम पूल हलवत असल्याचे प्रत्यक्षदर्शिंनी सांगितले आहे. या दुर्घटनेतून बचावलेल्या अहमदाबादेतील विजय गोस्वामी यांनी घटनेची आपबीती सांगितली आहे. गोस्वामी हे कुटुंबियांसोबत रविवारी दुपारच्या सुमारास या पुलावर पर्यटनासाठी गेले होते. यावेळी काही तरुण हा पूल मुद्दाम हलवत असल्याचं त्यांना दिसून आले. पुढचा धोका लक्षात घेता ते या पुलावरुन अर्ध्यातूनच माघारी फिरले. त्यानंतर अवघ्या काही तासातच हा पूल मच्छू नदीत कोसळला. गर्दीमुळे आणि काही तरुणांच्या कृत्यामुळे या पुलाला धोका असल्याची त्यांची भीती अखेर खरी ठरली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *