• Fri. Apr 26th, 2024

अन गडकरी, फडणवीसांच्या खुर्चीवर ‘ते’ स्वतःच झाले विराजमान!

Byjantaadmin

Nov 25, 2022

नाथजोगी भटका समाज मेळाव्याकडे भाजपा नेत्यांची पाठ

नाथजोगी भटका समाज मेळाव्यासाठी आयोजकांनी निमंत्रित केलेल्या भाजपच्या दिग्गज नेत्यांपैकी एकही नेता उपस्थित न राहिल्याने विदर्भातून आलेल्या नाथजोगी भटक्या समाजातील संतप्त बांधव नेत्यांचा निषेध करीत व्यासपीठावर ठेवलेल्या गडकरी, फडणवीसांच्या खुर्चीवर स्वतःच झाले विराजमान झाले व या नेत्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजीही केली. या घटनेची गुरुवारी दिवसभर राजकीय वर्तुळात चर्चा होती.

नाथजोगी भटक्या समाजाचा राज्यव्यापी मेळावा गुरुवारी सुरेश भट सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, खासदार रामदास तडस (वर्धा), खा. सुनील मेढे (भंडारा) , खा. अशोक नेते (गडचिरोली), आ. प्रवीण दटके, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. मोहन मते, आ. समीर मेघे, आ. पंकज भोयर (वर्धा), मदन येरावार (यवतमाळ) व इतर भाजप नेत्यांसह समाजाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात आले होते. दुपारी १२ ते ४ अशी या मेळाव्याची वेळ होती. व्यासपीठावर लावण्यात आलेल्या फलकावरही वरील सर्व नेत्यांची नावे ठळकपणे लिहिलेली होती. मेळाव्याला संपूर्ण राज्यातून समाज बांधव आले होते. मात्र एकही नेता मेळाव्याकडे फिरकला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयोजक निमंत्रितांशी संपर्क साधत होते. आता येतो, थोड्या वेळात पोहोचतो, असे आश्वासन त्यांना मिळत होते.

विशेष म्हणजे, गडकरी यांच्या कार्यालयातर्फे माध्यमांना देण्यात आलेल्या दैनंदिन कार्यक्रम पत्रिकेत या कार्यक्रमाचा समावेश होता. परंतु, वाट पाहूनही नेते येत नसल्याने उपस्थितांचा संयम सुटला. त्यांनी व्यासपीठावरील रिकाम्या खुर्च्यांचा ताबा घेत नेत्यांचा निषेध केला. जोपर्यंत नेते येणार नाहीत तोपर्यंत सभागृह सोडणार नाही, येथेच ठिय्या मांडून बसू, असा निर्धार काहींनी व्यक्त केला. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच आयोजकांनी संतप्त नागरिकांची समजूत घातली. त्यानंतरही उपस्थितांनी नेत्यांचा निषेध करीत सभागृह सोडले. भोजनाची व्यवस्था असतानाही अनेक जण ते न करताच निघून गेले. मेळाव्याला सुमारे आठशे ते हजार समाजबांधव उपस्थित होते. यात विदर्भातून आलेल्यांची संख्या अधिक होती.

याबाबत नाथजोगी समाज संघटनेचे अध्यक्ष पांडे महाराज यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही नेतेमंडळी आली नसल्याचे सांगितले. संघटनेचे नारायण बाबर (हिंगोली) यांनीही नेते न आल्याने समाजबांधव नाराज झाल्याचे सांगितले. यासंदर्भात संघर्ष वाहिनीचे मुकुंद अडेवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वरील बाबीला दुजोरा दिला. उपस्थितांची समजूत घातल्याने ते शांत झाले, असेही सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *