• Sat. Apr 27th, 2024

औरंगाबाद, उस्मानाबादनंतर आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराच्या नामांतराची तयारी?

Byjantaadmin

Feb 27, 2023

केंद्र सरकारने  औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला मंजुरी दिल्याने नामांतराचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. केंद्र सरकारच्या गृह विभागाने  राज्य सरकारला औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचं धाराशीव  नामकरण करण्यास कोणतीही हरकत नसल्याचं पत्र पाठवलं आहे. केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने यासंबंधी अधिसूचना जारी केली आहे. यादरम्यान आता महाराष्ट्रातील आणखी एका शहराचं नाव बदलणार असल्याची चर्चा रंगली आहे. याचं कारण म्हणजे आमदार गोपीचंद पडळकर  यांनी एक ट्विट केलं आहे.

औरंगाबाद आणि उस्मानाबादनंतर आता अहदनगरचं  नामांतरण होणार असल्याचं बोललं जात आहे. शिंदे सरकारच्या नेतृत्वाखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ होणार असा विश्वास गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे. यामुळे राजकीय वर्तुळात सध्या चर्चांना उधाण आलं आहे.

गोपीचंद पळडकर यांनी ट्वीटमध्ये काय म्हटलं आहे? 

“औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकारचे आभार व अभिनंदन. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचे जन्मस्थान असलेल्या अहमदनगरचे नामांतर ‘अहिल्यानगर’ देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात होणारच,” असं ट्वीट गोपीचंद पडळकर यांनी केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदेंनाही टॅग केलं आहे.

ठाकरे सरकारने घेतला होता निर्णय

राज्यात महाविकास आघाडी सरकार असतानाच औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशीव करण्याचा निर्णय झाला होता. शिंदे गटाच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याचे संकेत असतानाच ठाकरे सरकारची शेवटची मंत्रिमंडळ बैठक पार पडली होती. या बैठकीत घेतलेल्या निर्णयांमध्ये नामांतराचाही मुद्दा  होता. मात्र राज्यात शिंदे सरकार आल्यानंतर या निर्णयाला स्थगिती देण्यात आली होती.

फक्त ठाकरे सरकारने निर्णय घेतला असल्याने त्याच्यावर स्थगिती आणली जात असल्याने शिंदे सरकारला रोषाला सामोरं जावं लागलं होतं. यानंतर शिंदे सरकारने हा निर्णय कायम ठेवत दोन्ही शहरांची नावं बदलण्याचं ठरवलं होतं. त्यानुसार केंद्राला प्रस्ताव पाठवण्यात आला आणि आता त्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यातच गोपीचंद पडळकर यांनी आता अहमदनगरचा मुद्दा उपस्थित केला आहे. अहमदनगरचंही नामांतर व्हावं अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. अहिल्यानगर असं अहमदनगरचं नामांतर करण्याची मागणी असून आता ही मागणीही पूर्ण होणार का हे पाहावं लागेल.

शेतकऱ्यानं जगावं की मरावं? 100 किलो वांग्याला मिळाले फक्त 66 रुपये!

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *