• Fri. Apr 26th, 2024

सद्यस्थितीत समाजप्रबोधनासाठी ‘ विचारधन ‘ अत्यंत उपयुक्त ठरेल :  श्रीपाल सबनीस 

Byjantaadmin

May 5, 2023
सद्यस्थितीत समाजप्रबोधनासाठी ‘ विचारधन ‘ अत्यंत उपयुक्त ठरेल :  श्रीपाल सबनीस
लातूर : वर्तमान परिस्थितीत वावरणाऱ्या अनेक राजकीय पक्षाच्या नेत्यांनी लोकशाही किती खालच्या पातळीवर नेऊन  ठेवलीय, हे मागच्या काही दिवसात आपण सर्वजण पाहात  आहोत. संस्कृतीचे दिवाळे निघालेल्या या कालखंडात प्रत्येकजण स्वार्थाचे समर्थन करताना दिसतो. अशावेळी ज्येष्ठ विधिज्ञ मनोहरराव गोमारे लिखित ‘ विचारधन ‘ समाज प्रबोधनासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचे मत ज्येष्ठ साहित्यिक , विचारवंत श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
                          लातूर येथील ज्येष्ठ समाजवादी नेते एड. मनोहरराव गोमारे यांनी आणीबाणीच्या काळात कारागृहात असतानाच्या कालखंडात वाचलेल्या  विविध विषयांवरील १५० पुस्तकातील संकलित विचार एकत्रित करून ‘ विचारधन ‘ चे लेखन केले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शुक्रवारी ज्ञानेश्वर विद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून श्रीपाल सबनीस आपले विचार व्यक्त करत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालालजी सुराणा हे होते. यावेळी व्यासपीठावर एड. मनोहरराव गोमारे, प्रल्हादराव दुडिले, मनोज मनोहरराव गोमारे, सौ. कुसुमताई गोमारे, डॉ.रमण रेड्डी, एड. शोभा दुड्डे –  गोमारे, डॉ. रेखा रेड्डी – गोमारे , एड. अक्षय मनोज गोमारे आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी बोलताना श्रीपाल सबनीस पुढे म्हणाले की, अत्यंत सात्विक आणि सोज्वळ जीवन जगलेले  एड. मनोहरराव गोमारे जयप्रकाश नारायण यांच्या विचारांनी भारलेले  होते. जीवनाची अर्थपूर्णता करणारे ऐतिहासिक कार्य त्यांच्या हातून झाले असून त्यांना बाबा आढाव, पन्नालालजी सुराणा यांच्यासारख्या समाजवादी नेत्यांसोबत काम करण्याचे भाग्य लाभले. त्यांच्यासारखे तत्वनिष्ठ जीवन जगणाऱ्यांची संख्या आजमितीस अत्यंत नगण्य आहे,असेही ते म्हणाले.
             शिक्षणविषयक विचार व्यक्त करताना श्रीपाल सबनीस यांनी शिक्षक प्रयोगशील  असला पाहिजे असे सांगितले. नव्या शिक्षणाचा शोध आणि बोध घेण्याची शिक्षकाची तयारी असली पाहिजे. निर्गुण विचाराची पिढी घडविण्याचे काम शिक्षक करत असतो. नव्या पिढीला नैतिक शिक्षणाचे बळ  विचारधनच्या माध्यमातून मिळू शकते. विचारधनमुळे  नव्या पिढीला ज्ञानाचे धडे नक्कीच मिळतील असे सबनीस यांनी सांगितले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना पन्नालालजी सुराणा यांनी कष्टकरी, सामान्य नागरिक, महिलांच्या हितासाठी समाजवाद स्वीकारला गेला पाहिजे,असे सांगितले. समाजाशिवाय माणूस जगू शकत नाही. समाज चांगला राहण्यासाठी प्रत्येकाने चांगले वागले पाहिजे, असे सांगून त्यांनी विचारधन भावी पिढीसाठी अत्यंत महत्वाची भूमिका बजावेल  असा विश्वास व्यक्त केला.
एड. मनोहरराव गोमारे यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना जीवनात जेव्हा कठीण प्रसंग येतात तेव्हा त्याला शांततेने सामोरे जाऊन जीवनाची वाटचाल तेवढ्याच तन्मयतेने करणे गरजेचे असते हा संदेश या पुस्तकाच्या माध्यमातून आपण दिला असल्याचे सांगितले. आणीबाणीचे श्रेय तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यापेक्षा जयप्रकाश नारायण यांना  अधिक द्यायला हवे असे सांगताना त्यांनी इंदिरा  गांधींनी स्वार्थासाठी आणीबाणी लादली होती तर जयप्रकाश नारायण यांनी जनजागृतीचे काम हाती घेतल्याने  गांधींनी आणीबाणी लागू केली होती, असे गोमारे यांनी सांगितले.  या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रेखा रेड्डी – गोमारे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय भाऊसाहेब उमाटे यांनी करून दिला.  सूत्रसंचालन प्रा. अनिता येलमटे  यांनी तर आभार प्रदर्शन अक्षय गोमारे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
 ज्ञानेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक  एस.एम. वाघमारे, पेद्देवाड पी.जी. मलवाडे एस.एम. भाऊसाहेब उमाटे, सुधाकर बुरसे, आनंद देशमुख, राम मद्दे, अजय आरदवाड,विश्वनाथ खंदाडे, ज्ञानेश्वर बेंबडे, सतीश जडे,  एड. मच्छिन्द्र गुरमे , नवनाथ कवतिके यांसह  अनेकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *