• Sun. Apr 28th, 2024

देशाची अखंडता आणि एकता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे – अभिनव गोयल

Byjantaadmin

Oct 31, 2022

राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी धावले लातूरकर !!

देशाची अखंडता आणि एकता कायम ठेवण्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे – अभिनव गोयल

• एकता दौडला लातूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
• जिल्ह्यात शंभर ठिकाणी एकता दौडचे आयोजन

लातूर, दि.31(जिमाका) : देशाची अखंडता, एकता आणि अंतर्गत सुरक्षा कायम राखणे ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनय गोयल यांनी आज येथे केले.

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीदिनी, राष्ट्रीय एकता दिनानिमित्त लातूर जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि नेहरू युवा केंद्राच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राष्ट्रीय एकता दौडच्या उद्घाटनप्रसंगी श्री. गोयल बोलत होते.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लाकडे, शिक्षणाधिकारी श्रीमती वंदना फुटाणे, तहसीलदार महेश परांडेकर, तालुका क्रीडा अधिकारी सुरेंद्र कराड, राज्य क्रीडा प्रशिक्षक जयराज मुंढे, चंद्रकांत लोरगेकर, नेहरू युवा केंद्राचे संजय म्हमदापुरे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाची अखंडता आणि एकता कायम ठेवण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मोठे योगदान दिले. आज आपण देशाच्या स्वातंत्र्याचा आणि मराठवाडा मुक्तीदिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना सरदार पटेल यांच्या कार्याचे स्मरण करणे महत्त्वाचे असून यानिमित्ताने जिल्ह्यात विविध शंभर ठिकाणी एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने सर्व जाती-धर्माच्या लोकांनी एकत्र येवून देशाची अखंडता आणि एकता कायम ठेवण्याचा संकल्प करून त्यामध्ये आपले योगदान द्यावे, असे श्री. गोयल यावेळी म्हणाले.

विविध भाषा आणि जाती-धर्माच्या लोकांचे वास्तव्य असलेल्या देशात स्वातंत्र्यानंतर एकता आणि अखंडता कायम राखण्याचे कार्य सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्यांच्या कार्याची स्मरण करण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून एकता दौडचे आयोजन केले जात आहे. यानिमित्ताने सर्वांनी देशाची अखंडता, एकता, बंधुता कायम राखण्यासाठी योगदान द्यावे, असे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यावेळी म्हणाले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच उपस्थितांना राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शपथ देण्यात आली. सूत्रसंचालन क्रीडा अधिकारी कृष्णा केंद्रे यांनी केले.

मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षकही दौडमध्ये सहभागी

मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोयल आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्री. मुंडे यांनी हिरवी झेंडी दाखवल्यानंतर जिल्हा क्रीडा संकुल येथून एकता दौडला सुरुवात झाली. राजीव गांधी चौकमार्गे पुन्हा जिल्हा क्रीडा संकुल येथे आल्यानंतर दौडचा समारोप झाला. श्री. गोयल, श्री. मुंडे यांनीही दौडमध्ये सहभागी होत नागरिकांचा उत्साह वाढविला. या दौडमध्ये युवक, क्रीडाप्रेमी, विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *